
मुंबई प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे ठाकरेबंधू पुन्हा एकत्र येणार का, यावर चर्चा सुरू आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मनातील खदखद बोलून दाखवत सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा केली आहे.
महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधू आहेत. मनसेच्या स्थापनेपासून पक्षात राहून त्यांनी मराठवाड्यातील संघटन उभारणी केली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जाणारे महाजन यांनी काल अचानक राजीनाम्याची घोषणा करत सगळ्यांनाच धक्का दिला.
प्रकाश महाजन यांची खदखद
“कुठेतरी आपण आता थांबलं पाहिजे, ही भावना काही दिवसांपासून माझ्या मनात आहे. गंगेला बोल लावल्यानंतर, पहेलगामच्या वेळी मला थांबायला हवं होतं. पण सुधारणेची आशा होती. पक्षात मला कधीही तिकीट किंवा पदाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जपला जावा एवढीच इच्छा होती. पण अपेक्षेपेक्षा खूप उपेक्षा मिळाली,” असं महाजन यांनी भावनिक शब्दांत सांगितलं.
“लोकसभा असो वा विधानसभा, माझ्या कामाचा कधी गौरव झाला नाही. जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या तरी आरोप माझ्यावर झाले. मी अमित ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो नाही, ही खंत कायम राहील. मात्र, माझ्या पाठीशी नेहमी उभे राहिलेल्या मनसैनिकांचा मी ऋणी राहीन,” असंही ते म्हणाले.
नाराजीचं रूपांतर निर्णयात
अलीकडेच अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजनांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात यश आलं नाही. काही महिन्यांपासून ते मनसेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांपासून दूरच होते. अखेर त्यांनी “आता थांबायचं” असं स्पष्टपणे सांगत सक्रिय राजकारणातून पाय मागे घेतले.
मनसेसाठी धक्का
मनसेच्या स्थापनेपासूनच ते पक्षाचे चेहरा मानले जात होते. टीव्ही डिबेट शोमध्ये ते मनसेची बाजू ठामपणे मांडायचे. मराठवाड्यात त्यांचा आवाज बुलंद मानला जायचा. नुकत्याच नारायण राणे यांच्यासोबत झालेल्या वादामुळेही ते चर्चेत आले होते.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश महाजनांचा अचानक घेतलेला निर्णय मनसेसाठी निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे.