
वृत्तसंस्था
काठमांडू : नेपाळच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत एक ऐतिहासिक घडामोड घडली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधानपदी निवड झाली आहे. अशा प्रकारे त्या नेपाळच्या पहिल्या महिला कार्यकारी प्रमुख ठरल्या आहेत.
#WATCH | Kathmandu | Nepal's former Chief Justice, Sushila Karki, takes oath as interim PM of Nepal
Oath administered by President Ramchandra Paudel
Video source: Nepal Television/YouTube pic.twitter.com/IvwmvQ1tXW
— ANI (@ANI) September 12, 2025
गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड असंतोष उसळला होता. सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुण रस्त्यावर उतरले आणि तीव्र आंदोलन पेटले. वाढत्या दबावामुळे केपी शर्मा ओली यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला. परिस्थिती इतकी बिघडली की, स्वतः ओली यांना देश सोडून पळ काढावा लागला. या राजकीय अराजकतेतून देशाला बाहेर काढण्यासाठी अंतरिम सरकारची गरज भासली आणि त्यातच कार्की यांची निवड करण्यात आली.
कारकिर्दीतील नवा टप्पा
नेपाळच्या इतिहासात कार्की यांची नोंद आधीच झाली आहे. 2016 मध्ये त्या देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनल्या होत्या. आता पंतप्रधानपदी निवड झाल्याने त्यांनी आणखी एक नवा शिखर गाठला आहे.
साध्या कुटुंबातून न्यायव्यवस्थेच्या शिखरापर्यंत
सुशीला कार्की यांचा जन्म 7 जून 1952 रोजी विराटनगर येथे झाला. सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्की यांनी शिक्षणाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर आणि त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. 1979 मध्ये त्यांनी विराटनगरमध्ये वकिली सुरू केली.
2009 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 2010 मध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश पद मिळाल्यानंतर त्यांच्या न्यायनिष्ठ आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. 11 जुलै 2016 ते 6 जून 2017 या कालावधीत त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिल्या.
मोठ्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व
कार्की या कर्तृत्ववान आणि धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या अंतरिम नेतृत्वासमोर सध्या देशातील शांतता, सुव्यवस्था आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याचे आव्हान आहे. नेपाळची जनता त्यांच्या नेतृत्वाकडून नवा बदल आणि स्थिरतेची अपेक्षा ठेवून आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने कार्की यांची निवड ही एक मोठी पायरी मानली जात असून, नेपाळच्या राजकीय इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल.