
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेल्या लालबागचा राजा मंडळाच्या गणरायांची प्राणप्रतिष्ठापना बुधवार, २७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीसह दानपेट्यांवरही भाविकांनी उदंड प्रेमाचा वर्षाव केला.
पहिल्याच दिवशी मंडळाला सोन्या-चांदीच्या वस्तू, डॉलर्ससह परदेशी चलन आणि रोकड अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणावर दान मिळाले. यामध्ये तब्बल दोन लाखांचा सोन्याचा मोदक हा खास आकर्षणाचा विषय ठरला.
सोन्या-चांदीचा वर्षाव
भाविकांनी सोन्याची पावपलं, हार, मुकुट, अंगठ्या, नाणी, गणपती मूर्ती अशा वस्तू अर्पण केल्या. त्यात एका भाविकाने दिलेला सोन्याचा मोदक विशेष ठरला. चांदीच्या दानात एक किलोची वीट, मोदक, मुकुट, हार, पाळणे, समया आणि फुलघरं यांचा समावेश आहे.
डॉलर्सचे दान
भारतीय चलनाबरोबरच अमेरिकन डॉलर्सचे मोठ्या प्रमाणात दान आले आहे. परदेशातून येणाऱ्या भाविकांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी चलन अर्पण होत असल्याचे यंदाही स्पष्ट झाले.
दानाची मोजदाद
दानाची मोजदाद २८ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ही मोजदाद बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर बँक यांचे अधिकारी मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी व कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत करतात.
समाजोपयोगी खर्च
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिळालेलं दान सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याशी संबंधित उपक्रमांवर खर्च करत असते. गरजूंसाठी हा निधी वापरण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.