
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने २६ आणि २७ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत एकूण १९.६५ किलो वजनाचा संशयित हायड्रोपोनिक गांजा (Hydroponic Weed) जप्त करण्यात आला. या अमली पदार्थाची बाजारपेठेतील अवैध किंमत अंदाजे १९.६५ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात एकूण चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
बँकॉक प्रकरण
२६ ऑगस्ट रोजी VZ-760 या विमानाने बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या चेक-इन ट्रॉली बॅगेमध्ये लपवून ठेवलेले ११.६४ किलो हायड्रोपोनिक गांजा सीमाशुल्क अधिकाऱ्यांना आढळून आला. या दोन्ही प्रवाशांना एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली.
फुकेट प्रकरण
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे २७ ऑगस्ट रोजी फुकेटहून 6E-1072 या विमानाने आलेल्या दोन प्रवाशांना थांबवण्यात आले. तपासणी केली असता त्यांच्या सामानामध्ये ८.०१ किलो हायड्रोपोनिक गांजा आढळला. त्याची किंमत सुमारे ८.०१ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागाने सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. या अलीकडील कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात यश आले आहे.