
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | मालवणी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत २०४.६० किलो गांजा, देशी बनावटीचे पिस्तुल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या मुदामालाची एकूण किंमत सुमारे ७२ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.
२५ ऑगस्ट रोजी मालवणी परिसरात ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला वासिफ हुसेन खान (४८) याच्याकडून १ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात पाहीजे असलेला संतोष मोरे याला चांदवड टोल नाक्यावर सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीत मोरेने सांगितले की, गांजा धुळे-नाशिक परिसरातील चार जणांकडून आणण्यात आला होता.
यानंतर पोलिसांनी मालवणीतील मार्वे रोड, मढ परिसरात दोन संशयित वाहनांची झडती घेतली असता चार आरोपी आढळून आले. त्यांच्या वाहनांतून २०३ किलो गांजा सापडला. त्याचबरोबर एका आरोपीकडून पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. आरोपींनी हा गांजा ओडिशातून आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय हत्यार कायद्यान्वयेही कलमे लावण्यात आली आहेत. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) शशिकुमार मिना, परिमंडळ ११ चे उप पोलीस आयुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (मालवणी विभाग) निता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर (मालवणी पोलिस ठाणे), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे तसेच निगराणी पथकातील सपोनि सिद्धार्थ दुधमल, सपोनि हरीष शिळमकर, सपोनि साळुंखे, पोउपनि मासाळ, पोह. अनिल पाटील, पोह. स्वप्नील काटे, पो.शि. साजिद शेख, पो.शि. मुददसिर देसाई, पो.शि. समित सोरटे, पो.शि. कालीदास खुडे यांनी संयुक्तरीत्या केली.