
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष रंगत असून, भाविकांचे लक्ष पुन्हा एकदा लालबागच्या राजाकडे लागले आहे. दरवर्षी लाखो भक्त मंडपात दर्शनासाठी गर्दी करत असल्याने यंदा सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
लालबागच्या राजाभोवती हजारो पोलीस तैनात असून, मंडपाच्या आत-बाहेर तब्बल २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कॅमेऱ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यंत्रणा संशयास्पद हालचाली टिपून पोलिसांना तात्काळ इशारा देणार असून, गर्दीत आढळणाऱ्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्यासही ती मदत करणार आहे. भाविकांच्या हाती असलेल्या बॅगमध्ये संशयास्पद वस्तू असल्यास त्याची नोंद प्रणाली आपोआप घेईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
गेल्या वर्षी सुरक्षेबाबत काही त्रुटी असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर यंदा अधिक दक्षता घेतली गेली आहे. पोलिसांसोबत गुप्तचर विभागाचे अधिकारीही मंडप परिसरावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, लालबागच्या राजाच्या मंडपाला यंदा तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखावा देण्यात आला आहे. भव्य प्रवेशद्वार, हत्तीची प्रतिकृती आणि मुकुटाच्या आत विराजमान झालेली मूर्ती यामुळे मंडपाला आगळावेगळा थाट लाभला आहे. सजावटीची अंतिम कामे सुरू असून, काही तासांतच भाविकांसाठी दर्शन खुले होणार आहे. चिंचपोकळी, करी रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेचीही तयारी केली आहे.
एकंदरीत, लालबागच्या राजाभोवती सुरक्षेसाठी यंदा एआय तंत्रज्ञानाचा आधार घेतला असून, भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वंकष खबरदारी करण्यात आली आहे.