
मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सवात लाखो भाविक गणपती दर्शनासाठी तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल्वे विकास प्राधिकरणाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई मेट्रो वनची सेवा वाढवली
२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या अकरा दिवसांच्या कालावधीत मेट्रो सेवा रात्री १ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. याअंतर्गत वर्सोवाहून घाटकोपरकडे शेवटची मेट्रो रात्री १२.१५ वाजता सुटेल, तर घाटकोपरहून वर्सोवाकडे जाणारी शेवटची मेट्रो रात्री १२.४० वाजता धावेल, अशी माहिती मुंबई मेट्रोकडून देण्यात आली.
आधी ११, आता १ वाजेपर्यंत
यापूर्वी मुंबई मेट्रोची शेवटची सेवा रात्री ११ वाजेपर्यंतच उपलब्ध असायची. मात्र, गणेशोत्सवात होणारी मोठी गर्दी आणि भाविकांचा परतीच्या प्रवासातील त्रास लक्षात घेऊन हा कालावधी वाढवण्यात आला आहे.
सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा पर्याय
विसर्जनाच्या काळात विशेषतः रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अशावेळी प्रवाशांना सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर पर्याय म्हणून मेट्रो सेवा अधिक उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे उपनगरांमध्ये राहणाऱ्या भाविकांना परतीचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.