
मुंबई:प्रतिनिधी
बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून सिग्नल-फ्री रस्ते सुरु करण्यात येत आहे, नुकतंच .या रस्त्यांचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
या नव्या रस्त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वेहून बीकेसीमध्ये येणाऱ्या प्रवाशांना तीन पर्यायी मार्ग उपलब्ध झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होणार असून वाहतुकीचा वेग आणि प्रवासाचा अनुभव सुधारला जाणार आहे. ईस्टर्न सबर्ब्जमधून बीकेसीपर्यंत आता अवघ्या १५ मिनिटांत पोहोचता येईल. सहा लेनपैकी तीन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या असून उर्वरित तीन लेन लवकरच सुरू केल्या जातील. रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी एमएमआरडीएचे सहआयुक्त राधाबिनोद शर्मा, भाप्रसे, आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुम्भारे उपस्थित होते.
नव्या रस्त्याची मुख्य वैशिष्ट्ये
सिग्नल-फ्री कनेक्टिव्हिटी: १८० मीटर लांब, सहा लेनचा (३+३) हा रस्ता सिग्नल-फ्री वाहतूक प्रवाहाची हमी देतो, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित होतो.
वाहतुकीचे योग्य वितरण: बीकेसी कनेक्टर, ईईएच आणि अंतर्गत मार्गांद्वारे वाहतूक तीन भागांमध्ये विभागली जाते, ज्यामुळे कोंडी कमी आणि प्रवाह जलद होतो.
हा नवीन रस्ता एनएसईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी तसेच एमसीए क्लब, कॉन्सुलेट्स आणि एमटीएनएल यांसारख्या बीकेसीतील महत्त्वाच्या ठिकाणांसाठी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतो.