
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-ब सेवांच्या संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे तब्बल ६७४ पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांच्या ३९२ जागांचा समावेश करण्यात आला असून, पूर्वीच्या २८२ जागांबरोबर मिळून ही भरती विक्रमी ठरणार आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर पार पडणार आहे. अर्जप्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू असून, इच्छुक उमेदवारांना २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
यापूर्वी जाहीर झालेल्या २८२ जागांमध्ये PSI पदांचा समावेश नसल्याने हजारो उमेदवार निराश झाले होते. मात्र, नव्या सुधारणेनंतर PSI च्या ३९२ जागा समाविष्ट केल्याने परीक्षार्थ्यांचा उत्साह दुणावला आहे. यामुळे अनेकांना मुख्य परीक्षेत बसण्याची संधी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता
* मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनमान्य समतुल्य पात्रता आवश्यक.
* यावर्षी पदवीच्या अंतिम वर्षाला बसलेले उमेदवार तात्पुरते पात्र राहतील, मात्र मुख्य परीक्षेच्या अर्जाच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
* ज्या पदांसाठी इंटर्नशिप/कार्यशाळेचा अनुभव आवश्यक आहे, तो मुख्य परीक्षेच्या अर्जाच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण करावा लागेल.
* मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक.
राज्यातील युवकांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी मानली जात असून, लाखो उमेदवार आता PSI पदासाठी नव्या उत्साहाने तयारीला लागणार आहेत.