
पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात डोंगरगाव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लग्नाच्या मंगलमय जीवनाला सुरुवात होऊन अवघे तीन महिने झाले होते. स्वप्नांच्या महालात पाऊल टाकलेल्या १८ वर्षीय राणी मुंजाजी घाडगे हिचा संसार मात्र भीषण छळामुळे उद्ध्वस्त झाला. सासू-सुनेच्या नात्याला काळिमा फासणारा आणि पतीच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार समाज मनाला चटका लावणारा ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणी घाडगे हिचा विवाह भागवत अंकुश कदम (वय २४) याच्याशी थाटामाटात झाला. मात्र, लग्नानंतरच्या आनंदाच्या दिवसांतच काळोख दाटू लागला. पती भागवत कदम आणि सासू मुक्ता अंकुश कदम (वय ४५) यांनी राणीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. ‘तू जा मर’ अशा थरकाप उडवणाऱ्या शब्दांनी तिच्या मनावर जखमा उमटवल्या. मोबाईल फोन फोडून तिचा बाहेरील जगाशी संवाद तोडण्यात आला. घरात एकटी ठेवून, तिला कोणी भेटू न देऊन, तिचा आत्मसन्मान चिरडला गेला.
२४ मे ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चाललेल्या या अमानुष वागणुकीने त्रस्त होऊन राणीने अखेर टोकाचे पाऊल उचलले आणि स्वतःचे आयुष्य संपविले. राणीचा मृत्यू हा केवळ एका मुलीचा अंत नसून, ही समाजाच्या अंतःकरणाला हादरवणारी घटना आहे.
या घटनेनंतर राणीचा मामा महादेव कदम (वय ४१, रा. साईनगर, चंदननगर, मूळ रा. गंगाखेड, जि. परभणी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राणीच्या मृत्यूने डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विवाहानंतरच्या काही महिन्यांतच एका तरुणीचे जीवन असे निर्दयपणे संपुष्टात येणे हा आपल्या सामाजिक व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह आहे. विवाहबंधन म्हणजे प्रेम, विश्वास आणि आधार यांचा पवित्र संगम असतो; मात्र काहींच्या विकृत मानसिकतेमुळे हे नाते मृत्यूच्या दरीत लोटले जात आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.