
बारामती: प्रतिनिधी
बारामती : शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने धाडसी घटना घडवली आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास, बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम कॉलेज रस्त्यावर 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. यामुळे बारामती शहरात खळबळ माजली आहे, कारण हा गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खून ठरला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीमध्ये झालेल्या या प्रकरणामध्ये अनिकेत सदाशिव गजाकस (रा. बारामती) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हा युवक बारामती नगर पालिकेच्या घंटा गाडीवर चालक म्हणून काम करत होता. याप्रकरणी त्याचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस यांनी शहर पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगती नगर, बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड, जिजामाता नगर, बारामती) व संग्राम खंडाळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.