
कोल्हापूर प्रतिनिधी
अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन झाल्यानंतर तीच महिला गावात हप्ता भरण्यासाठी आली आणि जयसिंगपूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मृत समजून कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केलेली महिला साक्षात जिवंतपणी समोर आल्याने गाव हादरून गेलं आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसही बुचकळ्यात पडले असून, नेमकी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले तो कोणाचा, याचा तपास सुरु आहे.
जयसिंगपूर शहरातील 37 वर्षीय गृहीणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. पतीने याबाबत पोलिसात फिर्याद नोंदवली होती. तब्बल दहा दिवसांनंतर मिरज तालुक्यातील निलजी-बामणी नदीपात्रातून एका महिलेचा सडलेला मृतदेह सापडला. अंगावरील खुणा आणि साडी पाहून गृहीणीच्या पतीनं तो मृतदेह पत्नीचाच असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलीस खातरजमा करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
मंगळवारी रात्री उदगाव स्मशानभूमीत या महिलेवर अंत्यसंस्कार पार पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी रक्षाविसर्जनही करण्यात आलं. दुःखद वातावरणात नातेवाईक, मित्रमंडळी घरी सांत्वनासाठी जमले असताना अचानकच तीच महिला बचत गटाच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी घरी आली. हे पाहून गावकऱ्यांचे डोळे विस्फारले.
‘मृतदेह तिचाच’ असा गृहीत धरून चूक
मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पतीने पत्नीच्या चेहऱ्यावरील तिळावरून ओळख पटवल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्याच खुणेमुळे गोंधळ झाला. खरी पत्नी समोर आल्यावर कळलं की कुटुंबीयांनी दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केले होते.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. बेपत्ता महिला हयात असल्याची खात्री करून तिला पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. दरम्यान, मृत समजून अंत्यसंस्कार करण्यात आलेली महिला कोण होती, याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरु आहे.