
कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कुरुकली येथे गुरुवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर एसटीची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यावर स्टंटबाजीच्या नादात एका कारने धडक दिली. या भीषण अपघातात प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८, रा. कौलव, ता. राधानगरी) या बीएससीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आणखी तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत.
ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथून सुटलेल्या विद्यार्थ्यांचा घोळका बसस्थानकाकडे जात असताना, भरधाव वेगात आणि स्टंट करत आलेल्या कारने (क्र. MH BB 5907) थेट विद्यार्थिनींच्या दिशेने घाव घातला. कारमधील चार अल्पवयीन मुलांनी कॉलेज परिसरात स्टंटबाजी करत विद्यार्थिनींना चिरडले. या अपघाताने परिसरात मोठा गोंधळ उडाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्रसंगावधान राखत कारचा पाठलाग केला. काही अंतरावर भोगावतीजवळील ठीकपुर्ली फाट्यानजीक कार पकडण्यात आली. त्यावेळी कारमधील दोन अल्पवयीन मुलांनी पळ काढला. मात्र, चालक राजवर्धन सुरेश परीट (रा. राशिवडे) आणि त्याचा एक साथीदार यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
प्रज्ञा कांबळे ही बीएससीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. तिच्या निधनाने कौलव गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी संतापाची लाट उसळली होती. परिसरात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी पालक, विद्यार्थी आणि स्थानिकांनी केली आहे.
“एका निष्पाप जीवाची अशी वेठीस हुजेरी, प्रशासन कोणती पावले उचलणार?” असा सवाल आता संपूर्ण जिल्ह्यात विचारला जात आहे.