
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना लोकसभेत घेरल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं पत्राद्वारे कौतुक केलं आहे. दुबे यांनी मराठी माणसाला “आपटून आपटून मारू” असा वादग्रस्त उल्लेख केला होता, त्यानंतर संसदेत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावरून ठाकरे यांनी पत्र लिहून गायकवाड यांचं अभिनंदन केलं आहे.
“मराठी माणसानं तुम्हाला निवडून दिलं आहे, त्यामुळे त्या जनतेविषयी आपली जबाबदारी विसरता कामा नये. संसदेत महाराष्ट्राच्या खासदारांनी गप्प राहून अपमान सहन करावा, हे योग्य नाही. मात्र, तुम्ही जे केलं, ते खरंच उल्लेखनीय आहे,” असं ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात राज्यातील इतर खासदारांच्या मौनावरही खंत व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का बसले, हे समजत नाही. पण तुम्ही जो आवाज उठवला, ती ताकद दाखवली, त्याबद्दल तुमचं कौतुक करावे तेवढं कमी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा उल्लेख करत म्हटलं, “१८५७ चा उठाव असो किंवा स्वातंत्र्यलढा, मराठ्यांनी या देशासाठी झुंज दिली आहे. दिल्लीतील मुजोरांना सतत दाखवावं लागतं की मराठी माणूस अजूनही जागा आहे.”
पत्राच्या अखेरीस, “मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र या सर्वांसमोर आपले वैचारिक मतभेद क्षुल्लक ठरतात,” असंही ते नमूद करतात. तसेच, “तुमचा आवाज असाच बुलंद राहो,” अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.