
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. म्हाडाचा वरिष्ठ अधिकारी बाबुराव कात्रे याच्या बेकायदेशीर कमाईमुळे वैतागलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाने म्हाडामधील अंतर्गत भ्रष्टाचाराचा भीषण चेहरा पुन्हा समोर आणला आहे.
रेणू कात्रे (वय अंदाजे ४०) या रविवारी लोखंडवाला येथील रहेजा कॉम्प्लेक्समधील राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेने कात्रे कुटुंबीयांत शोककळा पसरली असून, या आत्महत्येमागे बाबुराव कात्रे यांचा मानसिक छळ आणि भ्रष्ट कारभार असल्याचा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.
दरमहा ५० लाखांची काळ्या पैशाची अफवा!
बाबुराव कात्रे हे म्हाडाचे उपनिबंधक असून, ते दरमहा ४० ते ५० लाख रुपयांची बेकायदेशीर कमाई करत होते, असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे पैसे अधिकृत न करता त्यांनी आपल्या सासऱ्यावरच त्याचे वैधीकरण करण्यासाठी दबाव टाकला. याला पत्नी रेणू यांनी तीव्र विरोध केला होता. या मुद्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असे.
वडिलांवर दबाव, पत्नीस मारहाण
बाबुराव कात्रे हे पत्नी रेणू यांच्या वडिलांवर काळा पैसा पांढरा करण्यासाठी सतत दबाव टाकत होते. नकार दिल्यास ते रेणूवर हात उगारत, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. मृत महिलेच्या भावाच्या म्हणण्यानुसार, या दबावाखाली रेणूच्या वडिलांनी अनेक वेळा १५ ते २० लाख रुपयांची मदतही केली होती.
चर्चेआधीच घेतलं टोकाचं पाऊल
घटनेच्या दिवशी, पुण्यात दोन्ही कुटुंबीयांमध्ये वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक ठरलेली होती. मात्र, संध्याकाळी बाबुराव कात्रे यांनी ती बैठक उघडपणे नाकारली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याच रात्री रेणू कात्रे यांनी आयुष्य संपवले.
गुन्हा दाखल, आरोपी फरार
समतानगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. बाबुराव कात्रे सध्या फरार असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
मृत रेणू यांच्या भावाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, “गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशाराही दिला आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात सरकार गंभीर पावले उचलेल का?
या प्रकरणानंतर म्हाडा आणि इतर शासकीय संस्थांतील भ्रष्टाचारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शासनाने या गंभीर आरोपांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी जनतेतून मागणी होत आहे.