
सातारा प्रतिनिधी
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी भीषण घटना घडली. कोल्हापूर डेपोची स्वारगेटकडे निघालेली शिवशाही बस (क्र. MH 06 BW 3523) भुईंज आणि बदेवाडी गावाच्या हद्दीत अचानक पेटली. चालक केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही क्षणांतच संपूर्ण बसने पेट घेतला आणि बस पूर्णतः जळून खाक झाली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेनंतर प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आग लागल्यानंतरही हायवे प्राधिकरणाची वा जिल्हा प्रशासनाची आपत्कालीन सेवा वेळेत पोहोचली नाही. यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, किसनवीर कारखान्याची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी धावली आणि त्यांनी आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली. घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
ही दुर्घटना बसमधील विद्युत प्रणालीतील दोषामुळे घडल्याची शक्यता वर्तवली जात असून, एसटी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.