
सातारा प्रतिनिधी
सातारा|पुण्यातील वयोवृद्ध महिलेला एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणाऱ्या एका आरोपीला साताऱ्यात अटक करण्यात आली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून, आरोपीकडून एटीएम कार्ड वापरून लॅपटॉप खरेदी केल्याचे समोर आले आहे.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी साताऱ्यातील एका दुकानात एटीएम कार्डद्वारे खरेदी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने शाहू स्टेडियम परिसरात छापा टाकून आरोपीला अटक केली.
चौकशीत आरोपीने पुण्यातील उत्तमनगर परिसरात एका वृद्ध महिलेला मदतीच्या बहाण्याने तिचे एटीएम कार्ड व पिन मिळवून बनावट कार्ड परत दिल्याची कबुली दिली. त्यानंतर तिच्या खात्यातून पैसे काढून खरेदी केली.
पुढील तपासात, आरोपीविरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हिमांशू इंद्रराज सिंग (रा. रखा, ता. पट्टी राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याला पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, तसेच पोलीस अंमलदार संजय शिर्के, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, स्वप्निल दौंड व दलजीत जगदाळे यांचे कौतुक केले आहे.