
मुंबई प्रतिनिधी
कांदिवलीच्या आकुर्ली भागात राहणाऱ्या म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून ही आत्महत्या झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली असून, मृत महिलेचे नाव रेणु कटरे (वय ४४) असे आहे. त्या शिक्षिका होत्या.
शनिवारी दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, त्यानंतर काही वेळातच रेणु यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर रेणु कटरे यांचे बंधू अॅड. नितीन शेवाळ यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, त्यांनी कटरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी बहिणीचा छळ झाल्याचा आरोप करत, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, आत्महत्येमागचं नेमकं कारण काय, याचा तपास समतानगर पोलीस करत आहेत. राज्यात विवाहित महिलांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, म्हाडा अधिकाऱ्याच्या घरातील या घटनेने चिंता वाढवली आहे.