
पुणे प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांना रेव्ह पार्टी करताना पुण्यात पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई पुण्याच्या खराडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेलवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत उपस्थित होते. या ठिकाणी दारू, हुक्का आणि अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा संशय असून सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.
प्रांजल खेलवलकर हे यापूर्वीही चर्चेत आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या आलिशान सोनाटा लिमोझिन कारविषयी गंभीर आरोप करत ती कार अवैध असल्याचा दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, एमएच १९ एक्यू ७८०० क्रमांकाची लिमोझिन कार ही जळगाव आरटीओमध्ये हलक्या वाहनांच्या (LMV) वर्गात नोंदवण्यात आली आहे, जी नियमबाह्य आहे.
दमानिया यांनी असेही नमूद केले होते की, अॅम्बेसिडर लिमोझिन वगळता अन्य लिमोझिन कारना भारतात परवानगी नाही. त्यामुळे ही नोंदणी चुकीच्या प्रकारे झाली असून कार जप्त करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
रेव्ह पार्टीच्या घटनेनंतर प्रांजल खेलवलकर पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. खडसे कुटुंबीय या प्रकारावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.