पुणे प्रतिनिधी
मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आजपासून मोठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या वतीने या गाडीमध्ये चार डबे वाढविण्यात आले असून, ही गाडी आता एकूण २० प्रवासी डब्यांसह धावणार आहे. या बदलाची अंमलबजावणी आजपासून (२८ जुलै) करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे विशेषतः दौंड, कुर्डवाडी आणि सोलापूर या मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या मागणीचा आणि प्रतिसादाचा अभ्यास करून डब्यांची वाढ करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी दिली.
प्रवास अधिक सुलभ, आरक्षणाची सोय
पुणे ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी गर्दी होत असल्यामुळे अनेकांना आरक्षण मिळण्यात अडचणी येत होत्या. आता डब्यांची संख्या १६ वरून २० करण्यात आल्यामुळे गाडीची प्रवासी वहन क्षमता तब्बल २० ते ३० टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे आरक्षण सहज मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
वेळापत्रकात कोणताही बदल नाही
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दररोज (बुधवार वगळता) संध्याकाळी ४.०५ वा. सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सायंकाळी ७.१० वा. पुण्यात पोहोचते आणि रात्री १०.४० वा. सोलापुरात दाखल होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ६.३० वा. सोलापूरहून मुंबईकडे पुन्हा प्रयाण करते. गाडी दादर, ठाणे, कल्याण, पुणे आणि कुर्डवाडी येथे थांबते.
मागणीचा अखेर स्वीकार
वंदे भारत एक्स्प्रेसमधील डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांकडून केली जात होती. अखेर रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळताच आजपासून वाढीव डब्यांसह ही गाडी धावणार आहे.
प्रवाशांसाठी ‘वंदे भारत’चा नवा अध्याय
ही सुधारणा केवळ प्रवासी क्षमतेत वाढ न करता, मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर जलद, आरामदायक आणि वेळेची बचत करणारा प्रवास आणखी सुकर करणारी ठरणार आहे. विशेषतः कामकाजासाठी दररोज प्रवास करणाऱ्यांना आणि पर्यटकांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे यांनी सांगितले की, “वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आजपासून २० डब्यांसह गाडी नियोजित वेळापत्रकानुसार धावेल.”


