
प्रतिनिधी पुणे
पुणे शहर पुन्हा एकदा खळबळून उठलं आहे! फुरसुंगीतील वडकी परिसरात रविवारी रात्री एका सासऱ्याने आपल्या जावयाची थेट गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सासरवाडीत येत दारूच्या नशेत सासू-सासऱ्याला शिवीगाळ करणे जावयाच्या जीवावर बेतलं.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृताचा नाव प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५) असून त्याने दारूच्या नशेत येत सासरवाडीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ आणि खोडसाळ वागणूक यामुळे सासऱ्याचा संयम सुटला. रागाच्या भरात सासऱ्याने गमजाने गळा आवळून आणि फरशीवर डोकं आपटून प्रशांतला जागीच ठार मारलं.
ही थरारक घटना रविवारी रात्री सुमारे ९.३० च्या सुमारास वडकी येथील कैलासनगरमधील वलवावस्ती येथे घडली. या घटनेनंतर फुरसुंगी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रशांतला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या घटनेनंतर आरोपी सासरा सुरेश बाबूराव जमदाडे (वय ५९) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड तणाव आणि धक्का बसलेला आहे. कौटुंबिक वाद, दारू आणि रागीट स्वभाव या सगळ्यांच्या माऱ्यात एका तरुणाचा बळी गेला आहे.