
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरात अंगावर शहारे आणणारा निर्घृण खून उघडकीस आला आहे. एका महिलेचा शारीरिक शोषण करून, तिला धमक्या देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याचा हात, पाय आणि डोकं शरीरापासून वेगळं करून, मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरून थेट हिरण्यकेशी नदीत फेकण्यात आल्याचा थरकाप उडवणारा प्रकार उघड झाला आहे!
लखन बेनाडे (रा. रांगोळी, ता. हातकणंगले) असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव असून तो गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिस तपासाला वेग आला आणि ही अंगावर काटा आणणारी कहाणी समोर आली.
तक्रारी, शोषण, धमक्या… आणि शेवटी मृत्यू!
या घटनेच्या मुळाशी आहे दोन वर्षांपूर्वीचा एक वाद. लखन बेनाडे याच्यावर अनेक महिलांनी गंभीर आरोप करत रील्सच्या माध्यमातूनही आवाज उठवला होता. त्यात एका महिलेनं, लक्ष्मी घस्ते हिने, पती जेलमध्ये असताना बचत गटासाठी कर्ज मागण्यासाठी लखनकडे मदत मागितली. मात्र त्याने तिचा विश्वासघात करत शारीरिक संबंध ठेवले, त्याचे व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
लखनने नंतर तक्रारी दाखल करून लक्ष्मी आणि तिच्या नवर्याला मानसिक त्रास दिला. यामुळे रोष वाढत गेला…
‘मी तक्रार मागे घेतो’, पण मृत्यू मागे हटला नाही!
10 जुलै रोजी लखनने लक्ष्मीला फोन करून तक्रार मागे घेतो असं सांगत तिला शाहूपुरीत बोलावलं. मात्र, तेथे त्याने तिच्यावर पुन्हा एकदा हात उगारला. यानंतर संतप्त झालेल्या लक्ष्मीनं आपल्या पतीला – विशाल घस्ते – हत्या करण्यास सांगितलं. विशालने त्वरित मित्रांना संपर्क केला.
सायबर चौकातून लखनचा पाठलाग करत तवेरा कारमध्ये जबरदस्तीने कोंबून, थेट संकेश्वरच्या हद्दीत नेत त्याचं निर्घृण हत्याकांड घडलं. लखनचे हात, पाय, आणि शीर शरीरापासून वेगळं करण्यात आलं. सर्व तुकडे पोत्यात भरून हिरण्यकेशी नदीत फेकले गेले!
चार आरोपी अटकेत; कबुलीने उडाला पोलिसांचाही थरकाप
या थरारक प्रकरणात पोलिसांनी खालील चार जणांना अटक केली आहे:
* लक्ष्मी विशाल घस्ते (36, रा. राजेंद्रनगर)
* आकाश उर्फ माया दिपक घस्ते (21, रा. तामगाव, करवीर)
* संस्कार महादेव सावर्डे (20, रा. देवाळे, करवीर)
* अजित उदय चुडेकर (29, रा. जुना वाशी नाका)
यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
‘कर्माचे फळ’?
लखन बेनाडेच्या विरोधात आधीपासूनच महिलांवरील छळाचे गंभीर गुन्हे दाखल होते. अनेक महिलांनी त्याच्या वागणुकीविरोधात रील्स करून आवाज उठवला होता. शेवटी, त्याच्याच वर्तनाचा शेवट त्याला गाठल्याचे पोलिसांकडून सूचित करण्यात आले आहे.
ही घटना केवळ गुन्हेगारीचा नाही, तर महिलांच्या स्वाभिमानाचा आणि अन्यायाच्या विरोधातील उठावाचा करडा इशारा आहे. कोल्हापूर हादरला, महाराष्ट्र सुन्न झाला…!