
मुंबई प्रतिनिधी
मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईला झोडपून काढले आहे. रविवारीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, काल भांडुपमधील खिंडीपाडा परिसरात एक गंभीर दुर्घटना घडली. ओमेगा हायस्कूलच्या मागे असलेली सुमारे ५० फूट उंच टेकडीवरील संरक्षक भिंत कोसळली आणि त्यासमवेत टेकडीवरील पाच घरांचा अक्षरशः चुराडा झाला.
Location "Nirmala chawl, dagline road, tin dargah near gaytari Vidya mandir Ambechi Bharani, Bhandup West
Dear @mybmc @mybmcWardS what actions taken by your side.#bhandup #Saiyaara pic.twitter.com/eZ68yYVb5y
— Dildar Idrish Ansari (@DildarIdrish) July 22, 2025
सुदैवाने, संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने आधीच घरं रिकामी केली होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा टेकडी भागातील अनधिकृत झोपड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसामुळे तडे गेले, क्षणात कोसळली भिंत प्रत्यक्षदर्श्यांच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे टेकडीवरील संरक्षक भिंतीला तडे गेले होते. काही वेळातच ही भिंत कोसळली आणि आजूबाजूची पाच घरे त्यात गाडली गेली. घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. नागरिकांनी या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले असून, ते सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.
धोकादायक झोपड्यांवर कारवाईची मागणी मुंबईतील कुर्ला, कांदिवली, दहिसर, मुलुंड, मालाड आणि भांडूपसारख्या टेकडी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. भांडूपच्या घटनेत जीवितहानी टळली असली तरी ‘वाईट वेळ सांगून येत नाही’, त्यामुळे प्रशासनाने अशा धोकादायक झोपड्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिकांकडून होत आहे.
मुंबईत अनेक भाग जलमय; वाहतूक विस्कळीत दरम्यान, रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक भाग जलमय झाले आहेत. अंधेरी सबवे परिसरात १ ते १.५ फूट पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी, गोखले पूल आणि ठाकरे पुलावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. तुर्तास हवाई वाहतुकीवर विशेष परिणाम झाल्याचे वृत्त नाही.
पुढील २४ तास महत्त्वाचे हवामान विभागाने मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.