कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तसेच शिक्षक व शिक्षण संस्थांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.
मृत मुख्याध्यापकांचं नाव मारुती व्हरकट (वय अंदाजे ५५) असं असून, त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर तात्काळ पोलीस, अग्निशमन दल आणि नगरपालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. व्हरकट यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या नातेवाईकांसह सहकारी शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी घटनास्थळी येत त्यांच्या आत्महत्येचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत्महत्येच्या नेमक्या कारणावर अद्यापही पडदा आहे.
दरम्यान, कागल पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुख्याध्यापकांप्रमाणे समाजात आदर्श स्थान असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, या प्रकारामुळे शालेय आणि सामाजिक क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे.
संपर्कात असलेल्यांनी दिली माहिती…
व्हरकट हे आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं.


