
मुंबई प्रतिनिधी
मुंबई |वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरात नियमाला न जुमानणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मनमानीवर सरकारने अखेर चांगलाच दंड थोपटला आहे. नागरिकांच्या तक्रारींना अखेर वजन मिळाले असून आजपासून या परिसरात विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली जात आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले . वांद्रे पूर्वचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांचीही या बैठकीस उपस्थिती होती या बैठकीत वरून सर देसाई यांनी रिक्षा चालकांच्या मुजरीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मुद्दा मांडला होता.
गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडून तक्रारींचा भडीमार सुरू होता – कोणतीही नोंदणी नसलेल्या रिक्षांची गर्दी, जवळचं अंतर नाकारणं, जादा भाडे आकारणं, प्रवाशांशी हुज्जत घालणं… आणि या सगळ्याचं थेट पडसाद मंत्री सरनाईक यांच्या कानावर पोहोचल्यावर तात्काळ कृती ठरवण्यात आली.
विशेष म्हणजे, याआधीही WhatsApp वर तक्रार नोंदविण्यासाठी क्रमांक देण्यात आला होता, मात्र त्याची प्रभावी प्रसिद्धी न झाल्याने तो उपक्रम केवळ कागदावरच राहिला. यावर नाराजी व्यक्त करत, नव्या मोहिमेसोबत तक्रारींसाठीचा WhatsApp व हेल्पलाइन क्रमांक जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या मोहिमेंतर्गत —
• अवैध रिक्षा व टॅक्सीवर तात्काळ कारवाई
• चालकांच्या कागदपत्रांची तपासणी
• प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
• हे सगळं प्रत्यक्ष अंमलात आणलं जाणार आहे.
‘नियम मोडणाऱ्यांना शिक्षा आणि प्रवाशांना दिलासा’, अशी या मोहिमेची भूमिका असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
मुंबईच्या वाहतुकीच्या गाभ्यातील या धोक्याच्या केंद्रावर सरकारने अखेर लक्ष दिलंय, हीच नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. आता पाहायचं, की ही मोहीम किती काळ टिकते आणि नियमांना कोणी वाकवू शकतं का, तेही पाहणे गरजेचे आहे.