
लखनऊ वृत्तसंस्थ
लखनऊत मुलीच्या हत्येनंतर आईनेच पतीवर टाकला खोटा आरोप; पोलिस तपासात धक्कादायक गुन्हा उघड
आईच्या अनैतिक संबंधांचा साक्षीदार ठरल्यामुळे 6 वर्षांच्या चिमुरडीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर आई आणि तिचा प्रियकर एकाच खोलीत पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. मृतदेहातून दुर्गंध येऊ लागल्यावर त्यावर परफ्युम फवारून पुरावा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढंच नाही तर या आईने आपल्या पतीवर खुनाचा आरोप करत खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट आखला होता.
हा प्रकार लखनऊच्या ठाकुरगंज परिसरात उघडकीस आला असून रोशनी नावाच्या महिलेने तिच्या सहा वर्षांच्या मुलीचा, सायनारा उर्फ सोनीचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
‘मी पप्पांना सगळं सांगणार’ – एवढ्याच शब्दांनी घेतला जीव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी आपल्या पतीच्या अनुपस्थितीत प्रियकर उदित जायसवालसोबत अनैतिक संबंध ठेवत होती. शनिवारी रात्री ही क्रूर घटना घडली. त्याच वेळी चिमुरडी सोनीने आईला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं आणि “मी पप्पांना हे सगळं सांगणार,” असं म्हणाली.
हे ऐकताच संतापलेल्या रोशनीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी हट्टाने बोलू लागल्यावर तिने मुलीचा गळा दाबून तिचा खून केला. या घटनेवेळी प्रियकर उदित देखील त्या घरातच होता. दोघांनी मिळून मृतदेह बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवला आणि त्याच खोलीत दारू व ड्रग्ज पार्टी केली.
मृतदेहावर परफ्युम, फरशीवर डिटर्जंट… पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
मुलीचा मृतदेह काही तासांनी दुर्गंध देऊ लागला. त्यानंतर मृतदेह एसीजवळ हलवण्यात आला आणि त्यावर भरपूर परफ्युम फवारण्यात आला. फरशी डिटर्जंटने धुतली गेली. काही दिवसांनी रोशनीने पोलिसांना फोन करून आपल्या पतीने म्हणजेच शाहरुखनेच खून केल्याचं खोटं सांगितलं. मात्र पोलिसांनी घटनास्थळी तपास करताच वेगळेच चित्र उभे राहिले.
सीसीटीव्ही, पोस्टमॉर्टममुळे भांडाफोड; प्रियकराचा खुलासा
पोस्टमॉर्टममध्ये मुलीचा खून 36 तासांपूर्वी झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, खुनाच्या वेळेस शाहरुख चौथ्या मजल्यावर नसल्याचं स्पष्ट झालं. यामुळे संशयाची सुई रोशनी आणि तिच्या प्रियकरावर वळली.
चौकशीत उदितने पोलिसांसमोर सर्व कबूल केलं. त्याने सांगितलं की, रोशनीनेच मुलीचा खून केला आणि यामध्ये त्याने तिची साथ दिली. त्यानंतर बेडमध्ये मृतदेह ठेवून आम्ही तिथेच ड्रग्ज घेतले आणि पार्टी केली, अशी खळबळजनक कबुली त्याने दिली.
पतीवर खोटा आरोप टाकण्याचा कट; सासरच्यांचा जामीन मंजूर
खून केल्यानंतर दोघांनी मिळून शाहरुखला अडकवण्याचा कट आखला. पोलिसांना खोटं सांगून गुन्हा चिथावण्याचा प्रयत्न केला. मात्र खोटं फार काळ लपलं नाही. याप्रकरणी रोशनीचा दिर सलमान, सासू परवीन आणि नणंदांवरही आरोप ठेवण्यात आला होता. मात्र चौकशीनंतर सोमवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
सध्या काय?
सध्या रोशनी आणि तिचा प्रियकर उदित जायसवाल हे दोघंही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खून, पुरावे नष्ट करणे आणि खोटा गुन्हा दाखल करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लखनऊ पोलिस अधिक तपास करत असून लवकरच आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
ही घटना केवळ एक खून नाही, तर आईच्या विकृत मानसिकतेचं भीषण रूप आहे. समाजाला हादरवणाऱ्या या घटनेमुळे ‘आई’ या नात्याच्या विश्वासावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.