
पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं होतं. आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंबाविरुद्ध प्रथमवर्ग न्यायालयात तब्बल १६७० पानांचं दोषारोपपत्र दाखल करत ‘अॅक्शन मोड’मध्ये प्रवेश केला आहे.
हा आरोपपत्र सोमवारी (ता. १४ जुलै) दाखल करण्यात आला असून, यामध्ये वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिष्मा, निलेश चव्हाण अशा प्रमुख आरोपींसह एकूण ११ जणांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी यामध्ये अवैध, ठोस व भक्कम पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे.
सत्ताधाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत संतापाचा उद्रेक
मे महिन्यात सुसगाव येथे वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर समाजातून संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावरून देखील हगवणे कुटुंबाविरोधात जोरदार संताप व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांवर दबाव वाढला होता.
महिला आयोगाची गृहविभागाकडे चौकशीची मागणी
या प्रकरणातील चार्जशीट सादर करण्यात झालेल्या विलंबाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाने गृहविभागाकडे यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दीड कोटींचं लग्न, पण…
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी मुलीच्या लग्नासाठी भव्य समारंभाचे आयोजन केलं होतं. पुण्यातील नामांकित रिसॉर्टमध्ये ५ हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या लग्नासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. फक्त जेवणासाठीच ५० लाखांचा खर्च झाला होता. यासोबतच ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर कार, चांदीची भांडी असा मोठा हुंडा हगवणे कुटुंबाकडे गेला, असे कस्पटे कुटुंबाचे म्हणणे आहे.
‘ग्लॅमरस’ लग्न, पण अखेर… मृत्यू
बाह्यत: वरकरणी भव्यदिव्य वाटणाऱ्या या विवाहात प्रत्यक्षात वैष्णवीवर सुरू होता तो काटेकोर छळाचा खेळ. सततच्या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं आणि संपवलं आयुष्य. तिच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला.
हगवणे कुटुंबाचा श्वास रोखणारी चार्जशीट
१६७० पानांच्या या विस्तृत चार्जशीटमुळे आता हगवणे कुटुंबावर कायदेशीर फास आणखी घट्ट होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पोलिसांनी गोळा केलेले पुरावे, साक्षी, कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार यावर आधारित असलेली ही कारवाई भविष्यात महत्त्वपूर्ण वळण घेऊ शकते.
“न्यायासाठी आमचा संघर्ष थांबणार नाही,” असं वैष्णवीच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे. पुणे पोलिसांच्या अॅक्शननंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाच्या पुढील न्यायप्रक्रियेवर लागलं आहे.