
पुणे प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी पहाटे थेट रस्त्यावर उतरले आणि हिंजवडी परिसरात वाढत्या वाहतूक कोंडी, अडथळे आणि अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाईचे आदेश दिले. पहाटे ६ वाजता आयटी हब समजल्या जाणाऱ्या हिंजवडीत ते अचानक दाखल झाले आणि प्रशासनाला सरळ सूचना दिल्या — “सरकारी रस्त्यावर अडथळा करणाऱ्यांवर थेट कारवाई करा. जे आडवं येईल त्याला उचला!”
हिंजवडीतील पाहणी दौऱ्यात अजित पवारांसोबत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस आणि स्थानिक प्रशासन उपस्थित होते. रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक मालमत्तेवर झालेल्या अतिक्रमणांचे थेट निरीक्षण करत पवारांनी अधिकाऱ्यांना फटकारले. “कोणाचंही ऐकू नका. सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. कलम 353 नुसार गुन्हे दाखल करा,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
खासगी जागेसाठी मोबदला, पण सरकारी जागेवर शून्य सहिष्णुता पवारांनी स्पष्ट केलं की, खासगी जागा बाधित होत असल्यास त्यांचा मोबदला दिला जाईल. मात्र, सरकारी मालकीच्या जागांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. “सरकारी रस्त्यासाठी कुणालाही मोबदला नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला गती देण्याचे आदेश दिले.
फोर लेन रस्त्यांचा आग्रह
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रस्त्यांचे चौपदरीकरण आवश्यक असल्याचे पवार यांनी अधोरेखित केले. “रस्ते छोटे ठेवू नका. फोर लेन रस्त्यांची कामं त्वरित सुरू करा,” असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.
या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या असून, हिंजवडी परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम वेगाने राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांचा हा अनपेक्षित दौरा आणि दिलेले स्पष्ट आदेश प्रशासनाच्या कामकाजावर मोठा परिणाम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.