
पुणे प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वीच पुणेकर मांसाहारी खाद्यप्रेमींची एकच धावपळ झाली आहे. येत्या गुरुवारी, २५ जुलैपासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत असल्याने आजचा रविवार म्हणजे मांसाहाराचा ‘शेवटचा संधीचा दिवस’ असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे शहरातील मटन व चिकन दुकानांपुढे पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पहाटे सहा वाजेपासूनच पुणेकरांनी मटन खरेदीसाठी गर्दी केली. दुकानांपुढील रांगा पाहता हे केवळ मांसाहार नसून भावनिक जोड असल्याचा प्रत्यय आला. विक्रेत्यांच्या अंदाजानुसार आज पुण्यात तब्बल ३ हजार किलो मटण विकले जाण्याची शक्यता आहे.
श्रावण महिन्याच्या सुरुवातीनंतर बहुतांश कुटुंबांमध्ये मांसाहार टाळला जातो. यंदा श्रावणाच्या आधीचा आजचा हा रविवार मांसाहारासाठी शेवटचा असल्याने पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. काही भागांमध्ये दुकानांमधील मटण साठा दुपारपर्यंतच संपल्याचेही चित्र होते.
दुकानांपुढील गर्दी पाहून अनेकांनी ब्लिंकिट, झेप्टो, स्वीगी इन्स्टामार्टसारख्या अॅप्सचा आधार घेतला. मात्र ऑनलाइन बाजारात मटण आणि चिकनसाठी ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झळ बसताना दिसतोय. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक किलो मटणासाठी तब्बल १२३० रुपये आकारले जात आहेत. तसेच गोदरेज रिअल गुड ब्रँडचे ४०० ग्रॅम बोनलेस चिकन ब्रेस्ट २४६ रुपयांना तर चिकन करीसाठी ४५० ग्रॅम चिकनसाठी १७० रुपयांपर्यंत किंमत आकारली जात आहे.
शहरातील प्रत्येक बाजारपेठेत आज ‘मटण संडे’चेच वातावरण जाणवत होते. अनेक विक्रेत्यांनी विशेष ऑफर व आकर्षक पॅकेजेसचीही घोषणा केली होती. काही ठिकाणी ‘पहिल्यांदाच एवढी गर्दी’ असा अनुभव विक्रेत्यांनी व्यक्त केला.
श्रावणभर संयम राखल्यानंतर पुन्हा गणेश विसर्जनानंतर मांसाहार सुरू होईल, तोपर्यंत पुणेकर आजच्या ‘मटण रविवार’ची चव चाखत आहेत.