
पुणे प्रतिनिधी
राज्यभरात प्रवाशांचा सुरक्षित प्रवास हा सर्वोच्च प्राधान्याचा मुद्दा असताना, पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वारगेटहून ठाण्याकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसचा चालक दारुच्या नशेत बस चालवत असल्याचे समोर आले असून, संतप्त प्रवाशांनी थेट कारवाई करत चालकाला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे.
ही घटना गुरुवारी (११ जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. स्वारगेट बस स्थानकावरून निघालेली ही शिवनेरी बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. प्रारंभी काही प्रवाशांनी चालकाच्या हातात सस्पिशस द्रव पाहिला, मात्र तो काहीतरी वेगळं पित असल्याचा अंदाज घेत ते गप्प राहिले. मात्र काही वेळातच चालकाने थेट बस चालवत असतानाच दारु प्यायला सुरुवात केली आणि प्रवाशांच्या संयमाचा अंत झाला.
नळ स्टॉप परिसरात हा प्रकार स्पष्टपणे दिसताच प्रवाशांनी बस रस्त्यावर थांबवून चालकाला रोखलं. तात्काळ पोलिसांना संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून चालकाच्या अल्कोहोल चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या धक्कादायक प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. “अशा बेजबाबदार चालकांमुळे आमचा जीव धोक्यात येतो, यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. दरम्यान, संबंधित चालकावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
घटना माहिती
* स्वारगेटहून ठाण्याकडे जाणारी शिवनेरी बस
* चालक दारु पिऊन बस चालवत असल्याचे निदर्शनास
* प्रवाशांनी नळ स्टॉपजवळ बस थांबवून पोलिसांना दिली माहिती
* पोलिसांकडून चालक ताब्यात, पुढील चौकशी सुरू
* प्रवाशांकडून कठोर कारवाईची मागणी
ही घटना प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.