
मुंबई, प्रतिनिधी
दारूवरील व्हॅट, उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कात झालेल्या मोठ्या वाढीमुळे राज्यातील हॉटेल आणि बार उद्योग आक्रमक झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (AHAR) राज्यव्यापी बंदची हाक दिली असून, येत्या 14 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहणार आहेत.
राज्य सरकारने महसूलवाढीच्या उद्देशाने घेतलेल्या निर्णयामुळे व्हॅटमध्ये दुप्पट वाढ, परवाना शुल्कात 15% वाढ आणि उत्पादन शुल्कात तब्बल 60% वाढ झाली आहे. या वाढीचा थेट परिणाम हॉटेल आणि बार उद्योगांवर झाला असून, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोषाची लाट उसळली आहे.
AHARने सरकारच्या या निर्णयाला अवाजवी आणि व्यवसायविरोधी ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “लहान आणि मध्यम व्यावसायिकांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या वाढीमुळे व्यवसाय करणं अशक्य होत चाललंय,” असा स्पष्ट इशारा असोसिएशनने दिला आहे.
राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोस निर्णय अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर 14 जुलै रोजी संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व बार, परमिट रूम्स, मद्य परवाना असलेली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहतील.
सरकार जर अद्यापही या आंदोलनाची दखल घेत नसेल, तर पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.
राज्यातील बार आणि हॉटेल व्यवसायावर मोठा आर्थिक भार पडत असतानाच सरकारची प्रतिक्रिया काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.