
मुंबई प्रतिनिधी
राज्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर अंकुश आणण्यासाठी लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारने ‘रोड सेल्फी असिस्ट’ ही आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीद्वारे रस्त्यावरील धोकादायक ठिकाणांची प्रत्यक्ष छायाचित्रांसह नोंद घेतली जाते. अपघात कमी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बीड जिल्ह्यातील अपघातांच्या पार्श्वभूमीवर लवकरच उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करून आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील कान नदीवरील पुलाच्या कामाबाबत आमदार मंजुळा गावित यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री भोसले म्हणाले, “साक्री तालुक्यातील कान नदीवर मोठा पूल उभारण्याचे काम सुरू असून, हे बांधकाम नियम व अटींच्या अधीन राहून कंत्राटदाराकडूनच पूर्ण करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा टिकवून ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.”
ते पुढे म्हणाले, “पुलासह उर्वरित कामे विहित कालावधीत पूर्ण केली जातील. सध्या कंत्राटदाराला एकूण देयकाच्या 60 टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे, तर उर्वरित रक्कम काम पूर्ण करून गुणवत्ता तपासणी झाल्यानंतरच देण्यात येईल.”
राज्यातील रस्त्यांची सुरक्षितता आणि अपूर्ण पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार सजग असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले.