
पुणे प्रतिनिधी
पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (वय अंदाजे ४५) यांचे बुधवारी सायंकाळी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना कात्रज मंडई चौकात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्या आकस्मिक निधनाने पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वणवे हे कात्रज मंडई परिसरात वाहतूक नियमनाचे काम करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या साईस्नेह रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
धनाजी वणवे हे गेली अनेक वर्षे पुणे वाहतूक विभागात कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठ, शांत आणि संयमी अशा स्वभावामुळे त्यांचा सहकाऱ्यांत व नागरिकांमध्ये चांगला वावर होता. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलाने एक निष्ठावान अधिकारी गमावला आहे, असे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.
त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, पोलीस विभाग त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली असून, सहकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या योगदानाला सलाम केला आहे.