
मुंबई प्रतिनिधी
मराठी-हिंदी भाषिक वादाचा पारा चांगलाच चढला असतानाच भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मराठी माणसावर आणि ठाकरे बंधूंवर पातळी सोडून टीका करणाऱ्या दुबेंचं स्वतःचं मुंबईशी गहिरं नातं समोर आलं आहे. खारसारख्या उच्चभ्रू भागात कोट्यवधींचा फ्लॅट असलेले निशिकांत दुबे एकेकाळचे मुंबईकर होते. मात्र, मराठी अस्मितेवर हल्ला करताना हे वास्तव ते सोयीस्करपणे विसरले असल्याचं दिसून येतं आहे.
१६०० चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट
निशिकांत दुबे यांचा खार पश्चिम येथील झुलेलाल अपार्टमेंटमधील १६०० चौरस फुटांचा फ्लॅट २००९ मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद झाला होता. या घराची किंमत तेव्हा १ कोटी ६० लाख रुपये होती, जी आजच्या घडीला कोट्यवधींमध्ये पोहोचली आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटवर आजही त्यांना भाडे मिळते, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते सचिन अहीर यांनी विधान परिषदेत दिली.
१६ वर्ष मुंबईत वास्तव्य
१९९३ ते २००० दरम्यान निशिकांत दुबे हे मुंबईत वास्तव्यास होते. या काळात त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करत संचालक पदापर्यंत प्रगती केली. मात्र, आज मराठी भाषिकांविरुद्ध आक्रमक विधान करताना, ते स्वतः किती काळ ‘मुंबईकर’ होते हे ते सहज विसरलेले दिसतात.
दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य
मराठी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या भाषेत दुबे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले होते, “घरात कुत्रादेखील वाघासारखा असतो. बाहेर पडून दाखवा, पटकपटक कर मारू.” इतकंच नव्हे तर “मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू,” असंही ते म्हणाले. मराठी समाजाविषयी असलेली ही टोकाची घृणा जनतेच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.
सचिन अहीर यांचा सवाल
“मुंबईत मराठी माणसाला घरं मिळेनाशी झाली आहेत आणि दुसरीकडे बाहेरून आलेले लोक येथे कोट्यवधींच्या मालमत्ता घेत आहेत,” असा थेट सवाल राष्ट्रवादीचे नेते सचिन अहीर यांनी उपस्थित केला. “निशिकांत दुबेंचा फ्लॅट भाडे तत्त्वावर दिलेला आहे, त्यातून त्यांना उत्पन्न मिळत आहे. मग मुंबईबद्दल तिरस्कार कशासाठी?” असा जाबही त्यांनी विधान परिषदेत विचारला.
दुबे यांचं विरोधाभासी वागणं उजेडात
एकीकडे मुंबईत नोकरी, घर, स्थायिकता आणि संपत्ती मिळवणारे दुबे, दुसरीकडे मुंबई आणि मराठी जनतेवर टिका करत असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. आता खुद्द निशिकांत दुबे या आरोपांना काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी अस्मिता आणि मुंबईच्या भूमीत जगलेला इतिहास विसरून गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेंच्या विरोधात मराठी जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. त्यांचं मुंबईतील वास्तव्य आणि संपत्ती उघड झाल्यानंतर, दुबेंनी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.