
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई – समलैंगिक संबंधाच्या अश्लील व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करून तब्बल ३ कोटी रुपये उकळण्यात आल्याने नैराश्यात गेलेल्या ३२ वर्षीय सनदी लेखापालाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांताक्रूझ येथे समोर आली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
राज मोरे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ते सांताक्रूझ परिसरात आईसोबत राहत होते आणि शीव येथील एका खाजगी कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर २०२४ मध्ये इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख राहुल शेरू पारवानी (वय २६) या तरुणाशी झाली. काही वेळातच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले.
या संबंधांची माहिती राहुलची सहकारी सबा इकबाल कुरेशी (वय २२) हिला मिळाली. तिने या दोघांचे खाजगी क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवले. त्यानंतर राहुल आणि सबा या दोघांनी मिळून राज मोरे यांना अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सातत्याने ब्लॅकमेल केले.
गेल्या १८ महिन्यांमध्ये त्यांनी राजकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळले. एवढेच नव्हे तर त्याची एक महागडी कारही त्यांनी ताब्यात घेतली होती. या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून राज मोरे यांनी रविवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली.
पोलिसांना घरातून सापडलेल्या तीन चिठ्ठ्यांमधून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या चिठ्ठ्यांमध्ये राहुल आणि सबा यांची नावे स्पष्टपणे नमूद असून त्यांनीच आपल्याला आत्महत्येपर्यंत प्रवृत्त केल्याचे राजने लिहिले आहे.
या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात राहुल शेरू पारवानी आणि सबा इकबाल कुरेशी यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम १०८, ३०८(२), ३०८(९३) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून,अटक करण्यात आली आहे.