
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने मालाड पश्चिम भागात मोठी कारवाई करत तब्बल दोन कोटी रुपयांच्या कोकेनसह एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी काल (५ जुलै) रात्री जेपी कॉलनी, ऑरलेम, मार्वे रोड परिसरात सापळा रचला. संशयास्पदरित्या फिरणाऱ्या या परदेशी नागरिकाची झडती घेतली असता त्याच्याकडे २०० ग्रॅम ‘कोकेन’ सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या अंमली पदार्थाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून अंमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरलेली होंडा सिवीक कार आणि तीन मोबाईल फोनही जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत जवळपास २.७५ कोटी रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सदर आरोपी कोणतीही वैध कागदपत्रे नसताना भारतात राहत होता आणि त्याचा पूर्व गुन्हेगारी इतिहासही उघड झाला आहे.
कोकेन हा अत्यंत धोकादायक उत्तेजक अंमली पदार्थ असून, यामुळे मतिभ्रम होण्याचा धोका असतो. पोलिसांनी या प्रकरणात एनडीपीएस कायदा १९८५ आणि परदेशी नागरिक कायदा १९४६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावंत व पथकाने ही मोहीम राबवली.
पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.