
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : अमेरिकन डॉलरच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने चार जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून डॉलरच्या आकाराचे काळ्या रंगाचे तब्बल ४२ बंडल, रासायनिक द्रावण, मोबाईल संच आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गु.नं. ३७५/२५, कलम ३१८(४), ६१, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश जाधव (वय ३७, रा. शिंदेवस्ती, श्रीगोंदा, अहिल्यानगर) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
अटक आरोपी: अफजलअली रियासतअली सय्यद (वय ४२), रईस अहमद अब्दुल जब्बार सय्यद (वय ४६), अबिदूर रेहमान मोहुउद्दीन शहा (वय २५), आदिल साहिल खान (वय ४०).
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मानखुर्द येथील ‘शिवकृपा हॉटेल रेसिडेन्सी’मध्ये आरोपी बनावट डॉलरच्या सहाय्याने फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कक्ष ६ च्या पथकाने सापळा रचत आरोपींना रंगेहात अटक केली.
छाप्यात डॉलरच्या आकाराचे काळ्या रंगाचे ४२ बंडल, ५ लिटर क्षमतेचे ४ रासायनिक कॅन, १ बाटली, ६ मोबाईल संच आणि ₹३०,४००/- रोख जप्त करण्यात आले. बनावट नोटा मूळ डॉलर असल्याचे भासवून त्या रासायनात बुडवून गंडा घालण्याचा प्रकार या आरोपींकडून करण्यात येत होता.
या कारवाईत प्र.पो.नि. भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सावंत, सपोनी धुतराज, चिकने, रहाणे, माशेरे, तसेच कर्मचारी देसाई, जाधव, शिंदे, गायकवाड, भालेराव, पाटसुपे, डाळे, ससाने, बोढारे आणि पाटील यांनी सहभाग घेतला. आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले असून ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुढील तपास सपोनी धुतराज करीत आहेत.