
सातारा प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील शिवथर गावात घडलेल्या खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पूजा जाधव (वय ३०) या विवाहितेचा तिच्याच घरात गळा चिरून खून करण्यात आला असून, अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक करत या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा केला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (७ जुलै) पूजा जाधव घरी एकटी असताना तिचा पूर्वीपासून ओळखीचा अक्षय रामचंद्र साबळे (वय २८, रा. शिवथर) तिच्या घरी गेला. त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि वाद विकोपाला जाताच आरोपीने धारदार शस्त्राने पूजाचा गळा चिरून हत्या केली. नंतर घटनास्थळावरून तो फरार झाला.
हत्या घडल्याची माहिती समोर येताच सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत आरोपीचा माग काढून रात्री उशिरा पुण्यातून अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
प्रेमसंबंधातून वाद निर्माण होऊन या खुनाची पार्श्वभूमी तयार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पूजा आणि अक्षय यांच्यात काही काळापासून संबंध असल्याची चर्चा असून, त्याच तणावातून घडलेल्या वादाचे रूपांतर अखेर निर्घृण हत्येत झाले.
या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अक्षय साबळे याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, ही घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.