
मुंबई प्रतिनिधी
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून आज सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यावर थेट नाराजी व्यक्त करत, “जर हा विषय मार्गी लावला नाही, तर आम्हाला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जात आहे, हे सांगावे लागेल,” असा तीव्र इशारा दिला.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याच्या मुद्द्यावरून भास्कर जाधव यांनी आवाज उठवला. “सरन्यायाधीश विधीमंडळात येत असताना, विरोधी पक्षाची भूमिका कोणी मांडणार? ही लोकशाहीची शोकांतिका नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, “हा मुद्दा माझ्या विचाराधीन आहे. कायदा आणि परंपरेचा विचार करूनच निर्णय घेणार आहे.”
यावर संताप व्यक्त करत भास्कर जाधव म्हणाले, “भाजपला दिल्लीमध्ये अवघ्या तीन सदस्यांवर विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं, मग इथे अडचण काय?” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, विधानसभेकडून त्यांना एक पत्र प्राप्त झालं असून त्यामध्ये कोणत्याही ‘१० टक्के आमदार’ अटीचा उल्लेख नाही.
अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यांचं बोलणं अडवत “असं चालणार नाही” असं म्हटलं, त्यावर भास्कर जाधवांनी “का नाही चालणार? मी फक्त विनंती करत आहे,” असं प्रत्युत्तर दिलं.
या चर्चेत मध्यस्थी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “भास्कररावांना त्यांच्या भूमिकेचं मांडणीची संधी दिली जावी. विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय सभागृहाच्या सन्मानाने घ्यावा.”
यानंतर अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलं की, “विरोधी पक्षनेतेपद मान्य करण्याचा संपूर्ण अधिकार माझा आहे. सभागृहात चर्चा करण्यापेक्षा मला दिलेल्या दालन भेटीतच आपण यावर सविस्तर बोललो आहोत.”
तरीही भास्कर जाधव मागे हटले नाहीत. “आम्ही वाद करत नाही, केवळ न्यायाची अपेक्षा करत आहोत. आम्ही सत्ताधाऱ्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. पण जर निर्णय होत नसेल, तर आम्ही सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत हे मुद्दे मांडूच,” असे ठाम शब्दात सांगत त्यांनी सभागृहात विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली.
या वादळात, विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. सत्ताधाऱ्यांचा सावधपणा आणि विरोधकांचा वाढता आक्रोश – या संघर्षाला आगामी राजकीय घडामोडींमध्ये काय वळण मिळेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.