
पुणे प्रतिनिधी
कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमधील संगणक अभियंता तरुणीवरील कथित बलात्कारप्रकरणी पुणे शहर हादरले असतानाच या प्रकरणात आता मोठा वळण घेणारा खुलासा समोर आला आहे. सुरुवातीच्या प्राथमिक तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक तथ्य उघडकीस आली आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली असून, त्यात अनेक बाबी तक्रारीतील वर्णनाशी विसंगत आढळल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने पीडितेच्या घरात बळजबरीने प्रवेश केला नव्हता. तसेच कोणताही स्प्रे मारल्याचा पुरावाही पोलिसांना सापडलेला नाही.
ओळखीचा पुरुष, डिलिव्हरी एजंट नव्हे
तपासादरम्यान हेही निष्पन्न झाले की, तक्रारदार तरुणीला संबंधित पुरुष ओळखीचा होता. तो कोणताही अधिकृत डिलिव्हरी एजंट नव्हता. तो तिच्या घरात तिच्या संमतीने प्रवेश केला होता, अशी माहितीही पोलिसांनी स्पष्ट केली आहे.
‘सेल्फीही संमतीने’ – पोलिसांचे म्हणणे
प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, संशयिताने पीडितेबरोबर सेल्फी घेतल्याचा आरोप. यासंदर्भातही पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, तो सेल्फी देखील संमतीनेच काढण्यात आला होता. पोलिस आयुक्त म्हणाले, “पीडितेच्या मोबाईलमधून मिळालेला सेल्फी नंतर एडिट करण्यात आला होता, हेही तपासात निष्पन्न झाले आहे.”
गुन्ह्याच्या स्वरूपावर अजूनही तपास सुरू
या प्रकरणात पोलिस अजूनही तक्रारीतील बलात्काराच्या घटनेचा तपास करत आहेत. तक्रारीनुसार, बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. तक्रारीनुसार पीडिता घरात एकटी असताना, एक डिलिव्हरी एजंट असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीने बळजबरीने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला.
तक्रार अर्जात असं नमूद आहे की, त्यानंतर पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढण्यात आला आणि त्यावर धमकीचा मजकूरही लिहून ठेवण्यात आला होता.
पोलिसांकडून कसून चौकशी
प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, संशयितास ताब्यात घेण्यात आलं असून, त्याचे तक्रारदार तरुणीशी पूर्वीपासून संबंध होते का याचाही तपास सुरू आहे.
पोलिसांनी मिळवलेल्या CCTV फुटेज, डिजिटल पुरावे आणि मेडिकल रिपोर्ट्स यांच्या आधारे आता पूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकण्याचे काम सुरू केले आहे.
पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या अतिशय संवेदनशील बनलेला असतानाच, अशा घटनांमध्ये खरे काय आणि खोटे काय याचा सुयोग्य तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणात प्रारंभीचा आरोप जितका गंभीर होता, तितक्याच गांभीर्याने पोलिसांनी तपास केला असून सध्याचा खुलासा हे दर्शवतो की प्रत्येक तक्रारीकडे केवळ भावनांच्या आधारे नव्हे, तर पुराव्यांच्या आधारेच न्यायालयीन प्रक्रिया पुढे नेली पाहिजे.