
पुणे प्रतिनिधी
पुणे विमानतळावर शनिवारी सायंकाळी थरारक प्रसंग घडला. भुवनेश्वरहून पुण्याकडे येणारे एअर इंडियाचे विमान (IX-1097) उतरण्याच्या तयारीत असतानाच अचानक धावपट्टीवर कुत्रा दिसला. सुमारे १५० फूट उंचीवर असताना वैमानिकाने प्रसंगावधान राखत लँडिंग थांबवले आणि विमान पुन्हा हवेत झेपावले. या नाट्यमय घटनेने क्षणभर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
सुमारे तासभर उशिराने विमान सुरक्षितपणे पुणे विमानतळावर उतरले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विमान काही फुटांवर येऊन थांबले नसते, तर मोठा अपघात टळला नसता, अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.
धोकादायक वाढ: पक्षी, कुत्रा आणि आता बिबट्याही!
पुणे विमानतळावरील धावपट्टीवर सतत आढळणारे पक्षी, कुत्रे आणि काही वेळा बिबट्याही आता विमानवाहतुकीस गंभीर धोका निर्माण करत आहेत. यामुळे विमानतळ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासन पक्ष्यांना हुसकावण्यासाठी उपाययोजना करत असले तरी ती तोकडी ठरत आहे. कुत्र्याचा वावर ही आता नियमित समस्या बनली आहे.
याआधीही कुत्रा… आणि लँडिंग रद्द!
दोन महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे उड्डाण करणाऱ्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये कुत्रा शिरल्याने वैमानिकाला उड्डाण रद्द करावे लागले होते. आता पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. धावपट्टीवरील सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब मानली जात आहे.
समिती फक्त नावालाच?
प्रत्येक प्रमुख विमानतळावर पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी कार्यरत असलेली ‘विमानतळ पर्यावरण समिती’ आता केवळ नावापुरती उरली आहे का, असा सवाल उपस्थित होतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असते. पक्षी, कुत्रे, डोंगर व इतर अडथळ्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणे हे तिचे काम. मात्र, पुणे विमानतळावर वाढलेला जीवजंतूंचा त्रास पाहता ही समिती नक्की काय करतेय, हा प्रश्न कायम आहे.
प्रवाशांचा अनुभव : ‘क्षणभर काळजात धस्स!’
“विमान उतरण्याच्या क्षणी अचानक झेपावले आणि आम्ही थक्क झालो. काही क्षणातच वैमानिकाने घोषणा केली की धावपट्टीवर कुत्रा आल्याने लँडिंग थांबवण्यात आले आहे. नंतर विमान जवळपास ३०-४० मिनिटे हवेत घिरट्या घालत होते,” असे प्रवासी हितेंद्र कुरणे यांनी सांगितले.
विमान सायंकाळी ७.१२ वाजता अखेर पुण्यात उतरले
या घटनेनंतर संबंधित विमानाने सायंकाळी सात वाजून १२ मिनिटांनी सुरक्षित लँडिंग केले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा विमानतळ सुरक्षेच्या प्रश्नांवर प्रकाश पडत असून, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत.