
पुणे प्रतिनिधी
कोंढवा येथील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या कथित बलात्कारप्रकरणात एक नवा वळण आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक न करता केवळ कलम ४१अ अंतर्गत नोटीस बजावून सोडून दिले आहे. या निर्णयामुळे शहरात खळबळ उडाली असून, कायद्याच्या कार्यपद्धतीवर अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित युवक आयटी अभियंता असून, प्रारंभी त्याला कुरिअर बॉय असल्याचे समजले जात होते. तरुणीने देखील सुरुवातीला “तो मला ओळखीचा नाही,” असा दावा केला होता. मात्र, पोलिसांनी तिच्यासमोर मोबाइल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे ठेवताच तिने त्याला ओळख असल्याचे मान्य केले.
स्प्रेचा पुरावा मिळाला नाही
तक्रारीनुसार, आरोपीने तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारून तिला बेशुद्ध केल्यानंतर लैंगिक अत्याचार केला होता. परंतु, पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्प्रे वापरल्याचा कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
५०० ठिकाणांचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले
तपास अधिक काटेकोर होण्यासाठी शहरातील ५०० हून अधिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीचा चेहरा पीडितेच्या सोसायटीतील फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आला. त्यानंतर, पोलिसांनी सोसायटीतील ४४ सदनिकाधारकांकडे सविस्तर चौकशी केली. मात्र, एकाही रहिवाशाने संबंधित तरुणाला ओळखले नाही, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
समोरासमोर चौकशी, दोन्ही कुटुंबीयांना माहिती
संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडित तरुणी व आरोपी यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती दोघांच्याही कुटुंबीयांना देण्यात आली असून, कायद्याच्या तरतुदीनुसार पोलिसांनी आरोपीला पुण्याबाहेर न जाण्याचे व बोलावल्यास हजर राहण्याचे आदेश देऊन नोटीस बजावली आहे.
“काही गोष्टी खोट्या सांगितल्या” – पीडित तरुणीचा कबुलीजबाब या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, पीडित तरुणीने “मी काही गोष्टी खोट्या सांगितल्या, मात्र त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला,” असा जबाब पोलिसांना दिला आहे. यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून, पोलिसांचा तपास सुरूच असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.