
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासन ऑक्टोबर महिन्यात तब्बल १० हजार पोलिसांची भरती करणार असून, ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी भरती ठरणार आहे.
गृह विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, अंतिम मंजुरीनंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर विविध पदांवर नियुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे.
या पदांसाठी भरती होणार:
या मेगाभरतीमध्ये बँड् समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई आणि राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार अशा विविध पदांचा समावेश आहे. उमेदवारांना फक्त एका जिल्ह्यासाठी आणि एका पदासाठीच अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क १ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया:
राज्यभर एकाचवेळी शारीरिक आणि लेखी चाचण्या घेतल्या जाणार आहेत (मुंबई वगळता). भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे:
शारीरिक चाचणी:
उमेदवारांची उंची, छाती मोजणे आणि धावण्याची कसून तपासणी केली जाईल.
लेखी परीक्षा:
मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल.
मुलाखत:
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
कागदपत्रे पडताळणी:
निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक व वैयक्तिक कागदपत्रे बारकाईने तपासली जातील.
वैद्यकीय तपासणी:
शेवटी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होईल आणि यशस्वी ठरलेल्यांची अंतिम नियुक्ती करण्यात येईल.
महत्त्वाचं:
भरती प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाची पाहणी करत राहणे गरजेचे आहे.
पोलीस बनण्याचे स्वप्न आता होणार साकार!
तरुणांनी आता कमर कसावी, शारीरिक आणि लेखी परीक्षेसाठी तयारीला लागावे. ही संधी तुमच्या हाती आहे – ती सोडू नका!