
स्वप्नील गाडे|रिपोर्टर
ठाणे – ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-५च्या पथकाने ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचत सुमारे ३१ लाख रुपयांचा चरस जप्त केला आहे. या प्रकरणी बिहारमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
३० जून रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई झाली. “एक इसम ठाणे पूर्व कोपरी रेल्वे स्टेशनजवळ चरस विक्रीसाठी येणार आहे,” अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सपोनिरी भुषण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला.
छापा टाकताच मोहंमद आफताब आलम मोहंमद सलीम अख्तर (वय ३४, रा. बबनगाव, तहसील नयागाव, जि. छपरा, बिहार) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३ किलो ९६ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ३० लाख ९६ हजार रुपये किमतीचा चरस, ११,५०० रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ३१ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.निरी पल्लवी ढगेपाटील करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत गुन्हे शाखा घटक-५ वागळे ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सपोनिरी भुषण शिंदे, सपोनिरी शरद पाटील, स.पो.निरी पल्लवी ढगेपाटील, पो.उपनिरीक्षक तुषार माने, सपो.उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, पो.हवालदार विजय काटकर, सुनिल निकम, संदीप शिंदे, सुशांत पालांडे, रावते, ज्ञानेश्वर जाधव, पो.शिपाई (२८५०) शेडगे, चा.पो.शि (७५४) यश यादव, पो.नाईक रघुनाथ गार्डे आणि चा.पो.शि यश यादव यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी या कारवाईत मिळालेला मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीच्या तस्करीतील इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे.