सातारा प्रतिनिधी
लोणंद|सम्राट स्टाईल्स या दुकानातून ड्रॉवरमधील तब्बल १ लाख ४७ हजार रुपये चोरी करणाऱ्या पती-पत्नी चोरट्यांना लोणंद पोलिसांनी केवळ १२ तासांत अटक केली. या प्रकरणात चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
२ जुलै रोजी कपील धन्यकुमार जाधव (रा. लोणंद, ता. खंडाळा) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दुकानातील ड्रॉवरमधून अज्ञात व्यक्तीने रोख रक्कम लंपास केली होती. तक्रारीनंतर लोणंद पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या गंभीर घटनेची दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे तपास सुरू केला.
शोध मोहीमेत देऊर (ता. कोरेगाव) येथील पती-पत्नी संशयाच्या रडारवर आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आणि चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांना खंडाळा न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली.
कोठडीत घेतलेल्या सखोल चौकशीत पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेली संपूर्ण रक्कम १ लाख ४७ हजार रुपये हस्तगत केली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोहवा संतोष नाळे, पो.ना. बापूराव मदने, पो.कॉ. अंकुश कोळेकर, अमोल जाधव, विठ्ठल काळे, अमीर जाधव व महिला पो.कॉ. अश्विनी माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील तपास पोहवा संतोष नाळे करत आहेत.
या कामगिरीबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे.


