
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | वर्सोवा पोलिसांनी अंधेरी पश्चिममधील म्हाडा परिसरातून एका नायजेरियन महिलेला अटक करत तिच्याकडून तब्बल १ कोटी ४२ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. मुंबईत अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी रात्रभर राबवलेल्या ऑल आउट ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३० जून रोजी रात्री तीनच्या सुमारास वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीसी पथक गस्त घालीत होते. या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन उगले यांना म्हाडा परिसरात एक नायजेरियन महिला संशयास्पद हालचाली करताना आढळली. तिच्यावर लक्ष ठेवून पो.उपनिरीक्षक उगले यांनी रात्रपाळीचे पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक अमोल ढोले यांना तत्काळ माहिती दिली.
महिलेवर सखोल संशय बळावल्यानंतर पो.नि. ढोले यांनी वर्सोवा मोबाईल पथक, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उपनिरीक्षक अमित जाधव, बीटअधिकारी सपोनी जाधव व अन्य कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावले. पोलिसांच्या पथकाने महिलेला थांबवून विचारपूस केली व तिच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी महिला पोलीस अंमलदाराच्या मदतीने केली. तपासणीत तिच्या बॅगेत एकूण ४१८ ग्रॅम वजनाच्या ३० कोकेनच्या कॅप्सूल सापडल्या.
सदर महिलेकडे चौकशी केली असता तिने स्वतःचे नाव येना ख्रिस्तीना इडोवा (वय ३४) असे सांगितले. ती मूळची नायजेरियातील ओनडो येथील असून सध्या नोएडा, नवी दिल्ली येथे वास्तव्यास होती.
पुढील कार्यवाहीसाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पंचांसमक्ष पंचनामा करून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२५ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क), २१(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त दक्षी गेडाम (परिमंडळ ९, बांद्रा पश्चिम), सहायक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर (डी. एन. नगर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक अमोल ढोले, सहा. पोलीस निरीक्षक अमित जाधव, पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पो.उपनिरीक्षक सचिन उगले तसेच पोलीस कर्मचारी पवार, इनामदार, किंजलकर, ठोंबरे व इतर पथकाने केली.
सदर कोकेन नेमके कुठून आणले व कोणाला देण्यासाठी आणले होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे.