
मुंबई प्रतिनिधी
राज्यात नव्या शैक्षणिक धोरणातील ‘हिंदी सक्ती’च्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका करत नव्या धोरणाचा निर्णय त्यांच्या सरकारच्याच काळात झाल्याचा दावा केला. मात्र, या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांनी थेट प्रत्युत्तर देत फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.
“उद्धव ठाकरे सरकारने माशेलकर समितीचा अहवाल मंजूरच केला नव्हता. फडणवीस खोटं बोलून जनतेला गाफील करतायत,” असे परब यांनी स्पष्ट केले.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप
राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि ठाकरे गट संयुक्तपणे रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ५ जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ठाकरे गट केवळ राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
“फडणवीस खोटं बोलत आहेत” – अनिल परब
या आरोपांना उत्तर देताना अनिल परब म्हणाले, “उद्धव ठाकरे सरकारच्या काळात माशेलकर समिती स्थापन झाली खरी, मात्र तिचा अहवाल मंत्रिमंडळात सादर केल्यानंतर तो अभ्यासगटाकडे पाठवण्यात आला होता. अभ्यासगटाची एकही बैठक होण्याआधीच ठाकरे सरकार कोसळलं. त्यामुळे अहवाल स्वीकारल्याचा फडणवीसांचा दावा पूर्णतः खोटा आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी स्वतः मंत्री होतो. आम्ही अहवालाचा अभ्यास सुरू केला होता. परंतु, कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याचं सांगणं म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं आहे.”
फडणवीसांचा दावा काय होता?
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, “नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर ठाकरे सरकारनेच माशेलकर समिती नेमली आणि त्यांचा अहवाल स्वीकारला. या अहवालात इंग्रजी व हिंदी या भाषांना मराठीसोबत सक्तीचे करण्याची शिफारस होती.”
“हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात घडलं. मग आता विरोध का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
राजकीय धग वाढण्याची शक्यता
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी होणारा संयुक्त मोर्चा अधिकच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाषेच्या मुद्यावरून रंगलेली ही लढाई सध्या केवळ शाळांपुरती न राहता, राजकीय व्यासपीठावर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.