
मुंबई प्रतिनिधी
मुंबई अग्निशमन दलावर आता आगीशमनाबरोबरच पशू-पक्ष्यांचे प्राण वाचवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या वर्षभरातच विविध अग्निशमन केंद्रांना झाडांवर, विद्युत केबलवर अडकलेल्या पक्षी आणि नाले-गटारात पडलेल्या प्राण्यांची सुटका करण्यासाठी तब्बल 5 हजारांहून अधिक कॉल प्राप्त झाले.
10-15 वर्षांपूर्वी हे प्रमाण केवळ 500 ते 600 कॉलपर्यंत मर्यादित होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत पक्षी व प्राणीमित्रांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे या कॉलमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, दररोज किमान 10 ते 12 आपत्कालीन सुटकेचे कॉल येतात, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कॉल आल्यानंतर घटनास्थळी एक अग्निशमन गाडी आणि चार ते पाच जवानांची टीम पाठवली जाते. विद्युत केबल आणि उंच झाडांवर अडकलेल्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी जवानांना जीव धोक्यात घालावा लागतो. अनेकवेळा काठीचा आधार घेत शिडीवर चढून पक्ष्यांना उतरवले जाते. त्यामुळे अपघाताचीही शक्यता असते.
यासाठी 2018 मध्ये महापालिकेने ‘बर्ड रेस्क्यू टेलिस्कोपिक रॉड’ खरेदी केले होते. मात्र, सध्या अनेक रॉड निकामी झाले आहेत. त्यामुळे पुन्हा नवीन रॉड खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 57 टेलिस्कोपिक रॉड खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे 2 कोटी 15 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे रॉड हलक्या वजनाचे, 16 फूट उंचीपर्यंत पोहोचणारे असून, बंद होणाऱ्या टेलिस्कोपिक पद्धतीचे असतील. लवकरच हे रॉड मुंबईतील 35 अग्निशमन केंद्रांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात उपकरणे उपलब्ध होणार आहेत.
दरवर्षी सुमारे 15 हजार आपत्कालीन प्रसंगांचा सामना करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना आता आगीशमनाव्यतिरिक्त झाड पडणे, अपघात, रसायन गळती, घर कोसळणे अशा दुर्घटनांसह पशू-पक्ष्यांच्या जीवरक्षणाचेही मोठे आव्हान पेलावे लागत आहे.