
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील हाजी अलीजवळील लोटस जेट्टी परिसरात काल सायंकाळी हृदयद्रावक घटना घडली. अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती सध्या स्थिर आहे. संतोष विश्वेश्वर (वय ५१) आणि कुणाल कोकाटे (वय ४५) अशी मृतांची नावे असून, संजय सरवणकर (वय ५८) यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोअर परळ येथील संभाजीनगर परिसरात राहणारे एमएसईबीचे कर्मचारी आणि कबड्डी प्रशिक्षक संतोष विश्वेश्वर यांच्या आईच्या बाराव्याच्या निमित्ताने अस्थी विसर्जन करण्यासाठी ते आपल्या दोन मित्रांसोबत लोटस जेट्टी येथे गेले होते. मात्र मागील काही दिवसांपासून समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने समुद्र खवळलेला असतानाच त्यांनी विसर्जनास सुरुवात केली. याच दरम्यान अचानक आलेल्या प्रचंड लाटेने तिघेही समुद्रात ओढले गेले.
स्थानिक मच्छीमार आणि ताडदेव पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिघांनाही तातडीने समुद्राबाहेर काढण्यात आले आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी संतोष विश्वेश्वर आणि कुणाल कोकाटे यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. संजय सरवणकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
या घटनेने लोअर परळमधील बीडीडी चाळ, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब आणि एमएसईबी कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. संतोष विश्वेश्वर हे परिसरातील लोकप्रिय क्रीडाप्रशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांचा अचानक मृत्यू ही समाजासाठी मोठी हानी मानली जात आहे.
ताडदेव पोलिस ठाण्याच्या PSI श्रीमती राजपूत यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासन आणि पोलीस वेळेवर पोहोचले नसते, तर आणखी जीवितहानी झाली असती. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ताडदेव पोलीस करत असून, समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज या घटनेनंतर अधोरेखित झाली आहे.