
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचारा विरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय आहे .लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्याविरुद्धची लढाई सुद्धा मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते.मात्र चक्क न्यायाधीश महोदयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील महिला तक्रारदाराच्या वडिलांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून, त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी सत्र न्यायालय, सातारा येथे जामीन अर्ज दाखल केलेला आहे. तो जामीन अर्ज मंजूर करुन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात यांनी लोकसेवक न्यायाधीश धनंजय निकम यांच्या सांगण्याप्रमाणे व त्यांच्यासाठी तक्रारदार यांचेकडे पाच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटी करप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासोबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.